भाजप नगरसेविकेच्या पतीने नाशिकच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड, अधिकाऱ्यांना मारहाण

7

नाशिक, १६ मे २०२१: भाजप नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात मोठा राडा केला असून, हॉस्पिटलच्या काचा फोडत शिवीगाळ केल्यानं एकच खळबळ उडालीय. बिटको रूग्णालयात शनिवारी सायंकाळच्या सुमारास इनोव्हा कार घुसवून रूग्णालयाची मोठया प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यावेळी रूग्णालयातील कर्मचार्‍यांना मारहाण व शिवीगाळही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र (कन्नू) ताजणे यांनी हा धुडगूस घातल्याचं समोर आलंय. भाजप नगरसेविकेच्या पतीच्या या दादागिरीनं महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच मोठं नुकसान झालंय.

मद्यधुंद अवस्थेत केले रुग्णालयाचे नुकसान

नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये भाजपा नगरसेविका सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने यांनी मद्यधुंद अवस्थेत अक्षरश: धिंगाणा घातला. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे एक पांढर्‍या रंगाची इनोव्हा कार रूग्णालयात घुसली. क्षणार्धात ही कार रूग्णालयाचं प्रवेशव्दार तोडून थेट रूग्णालयात शिरली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी रूग्णालयाच्या काचांची तोडफोड करण्यात येऊन परिसरातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. यावेळी स्ट्रेचर आणि ऑक्सिजन टँकचं नुकसान करण्यात आलं. काही कळायच्या आत पुन्हा ही कार रूग्णालयातून बाहेर पडली.

मिळालेल्या माहितीनुसार सदरची व्यक्ती ही भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे असून, तोडफोडीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार ताजणे यांच्या वडीलांचे काही दिवसांपूर्वी याच रूग्णालयात निधन झाले होते. तसेच, येथे रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची त्यांची तक्रार असल्याचेही समजते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा