भुसावळ, 18 डिसेंबर 2021: जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं असून अनेक नगरसेवकांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. भुसावळ मध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अशातच अनेक नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेत खडसे यांनी भाजपला धक्का दिला आहे. हा प्रवेश सोहळा भुसावळ शहरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आज शुक्रवारी पार पडला.
भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. जळगाव जिल्ह्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. भुसावळ इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण तसंच विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानतंर आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी भाजपला लगावलाय. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा आपण मार्ग काढू असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे