Former BJP Corporator Son Accused of Sexual Assault in Pune: प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि पीडित तरुणी यांची ओळख एका जीममध्ये झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता आरोपीने टाळाटाळ केली. तसेच आरोपीचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा पीडितेला संशय आल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. पीडित तरुणीने आरोपीच्या आईला ही बाब सांगितली. त्यावर आरोपीने तिला १७ डिसेंबर २०२२ रोजी भेटून ‘मला शेवटचे भेट, नाही तर मी तुला संपवून टाकेल’, अशी फोनवरून धमकी दिली.
पीडित तरुणी गर्भवती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर २०२४ मध्ये पीडित तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. त्यामुळे घाबरून तिने आपल्या आजीची तब्येत खराब असल्याचे सांगून अहिल्यानगरला जायचे आहे, असे खोटे सांगितले. १३ मार्च रोजी पीडिता पुण्यात आली आणि तिने पोलिसात तक्रार दिली.
या प्रकरणी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की, पीडिता गरोदर आहे. तिचे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपीसोबत आळंदीत हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न झाले आहे. केवळ कौटुंबिक वादातून, बदनामीच्या उद्देशाने पीडितेने बलात्काराचा खोटा आरोप केला आहे. याची कोणतीही शहानिशा न करता मुलाविरोधात खोटा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गुन्हा रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत असे सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे