पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली

पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. परंतु भाजपने मिशन २०२४ साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे.

२०२४ च्या निवडणुकीसाठी पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे देण्यात आली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात. परंतु निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उमेदवारी त्यांनाच मिळणार का ? हे मात्र येणाऱ्या काळात पाहावे लागणारन आहे.

बारामती लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ काँग्रेस कडून खेचल्यापासून भाजपकडे आहे. त्याची जबाबदारी मुरलीधर मोहळ यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतात. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची ही जागा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले.

पुणे लोकसभा मतदार संघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ पासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. गिरीश बापट २०१९ मध्ये या ठिकाणी खासदार झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. आता या ठिकाणी त्यांचा वारसदार कोण ठरणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा