भाजप नेत्याच्या कारने चिरडलं आंदोलन करणाऱ्या 4 शेतकऱ्यांना, चौघांचा मृत्यू

12

युपी, लखीमपूर, 4 ऑक्टोंबर 2021: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या टिकुनिया भागात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाला वेग आला आहे. शेतकऱ्यांशी झालेल्या हिंसक संघर्षात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आशिष मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चढवली, असा आरोप आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात्मक हिंसाचारात भाजप नेत्याच्या ड्रायव्हरसह इतर चार लोकांचा मृत्यू झाला. हे शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. अपघातानंतर गोंधळ सुरू झाला आहे. घटनास्थळी तीन वाहनं जाळण्यात आली. परिसरातील परिस्थिती बिघडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एडीजी एलओ प्रशांत कुमार यांना लखीमपूर खेरीला पाठवलंय.

लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर राजकीय व्यक्तींचं येथे येणं सुरू झालं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी लखीमपूरला रवाना झाल्या आहेत. दुसरीकडं, अखिलेश यादवही उद्या लखीमपूर खेरीला पोहोचतील. जयंत चौधरीही घटनास्थळी पोहोचण्याची तयारी करत आहेत. बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा हेही लखीमपूरला रवाना होत होते. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मात्र, पोलीस पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांना लखीमपूर खेरीला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे.

भारत किसान युनियनच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं, त्यात म्हटलंय की, लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्री तेनी यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेजेंद्र सिंह विर्क जखमी झाल्याची माहिती आहे. राकेश टिकैत गाजीपूरहून निघत आहेत. दुसरीकडं, एसकेएमचा दावा आहे की या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात 20 वर्षीय लवप्रीत, 19 वर्षीय गुरविंदर सिंग आणि नक्षत्र सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय 15-16 लोक जखमी झाल्याचा दावा करण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे