नवाब मलिक यांना भाजप ऑफर देऊ शकतो, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा दावा

जळगाव, १२ ऑगस्ट २०२३ : अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना तब्बल १७ महिन्यानंतर जामीन मिळाला आहे.अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणा वरून मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे मलिक आता अजितदादा गटात जाणार की शरद पवार गटात जाणार? मंत्रीपद घेणार की राष्ट्रवादीचे काम करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मलिक यांची आगामी भूमिका गुलदस्त्यात असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा दावा केला आहे. शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर उपकार आहेत. शरद पवार यांनी मलिक यांना राजकारणात अनेकदा संधी दिली आहे. मलिक यांचेही पक्षासाठी मोठे योगदान आहे. पण मलिक हे शरद पवार यांच्यासोबत राहतील यात शंका नाही. नवाब मलिक हे जर भाजपमध्ये गेले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील. त्यामुळे ते कुठे जाणार हे काळच ठरवेल. भाजप त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर देऊ शकतो, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

खडसे यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही टीका केली. भाजपा जवळ एक अशी मशीन आहे. घाणेरडा माणूस असला तरी या मशीनमध्ये स्वच्छ होतो. या तीन इंजिनच्या सरकारमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे जमत नव्हते. त्यातच राष्ट्रवादी आल्यामुळे सत्तेची वाटणी झाली. तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरघोडी मोठ्या प्रमाणात आहे, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा