भाजप खासदाराची भर संसदेत बसपा खासदारांवर आक्षेपार्ह टिप्पणी

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२३ : लोकसभेत चांद्रयान-३ मोहिमेवरील चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधूरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. चर्चेदरम्यान व्यत्यय आणल्यावर बिधूरी यांनी दानिश अली यांचा दहशतवादी असा उल्लेख केला. त्यानंतर बिधूरी यांची आक्षेपार्ह टिप्पणी लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत लोकसभेत खंत व्यक्त केली.

संसदेच्या विशेष अधिवेशनच्या चौथ्या दिवशी लोकसभेत खासदार रमेश बिधूरी चंद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. त्याचवेळी बसप खासदार दानिश अली यांनी काहीतरी विधान केले. यावर बिधूरी संतापले. प्रत्युत्तरात त्यांनी “ओय दहशतवादी ये आतंकवादी है” अशा आक्षेपार्ह शब्दांत अली यांच्यासाठी वापर केला. त्यांच्या या आक्षेपार्ह शब्दांवर विरोधाकांनी कडाडून आक्षेप घेतला. दानिश अली हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

काहीवेळाने या अपशब्दांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. सिंह यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, जे शब्द उच्चारले गेले ते मी ऐकले असून मी अध्यक्षांना हे शब्द कामकाजातून काढून टाकावे अशी विनंती करत आहे. मी या शब्दांमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर विरोधकांचा राग काहीसा शांत झाला आणि त्यांनीही बाके वाजवून त्यांच्या या दिलगिरीचा स्वीकार केला.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा