मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ : छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यावरील विविध नेत्यांची मते यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण नेहमीच बदलत असते. अनेकवेळा हे वातावरण वादग्रस्त वक्तव्यांमुळेच खराब झालेलं पाहायला मिळतं. अशातच आणखीन एका विधानाची यात भर पडली आहे. काय आहे, हे विधान पाहूयात-
“औरंगजेबाला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा माफी मागितली,” असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केले आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या; परंतु आता सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय वातावरण ढवळून निघाले. सुधांशू त्रिवेदी यांनी हे विधान आधीही केलं होतं. एवढेच नाही तर वृत्तवाहिनीच्या डिबेट्समध्येही ते खूप वेळा या संदर्भात बोलले होते. त्याचाच व्हिडिओ व्हायरल होऊन या विधानावर जोरदार टीका होतेय.
या विधानावर आव्हाड यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबाची माफी मागितली, असं बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली. तर सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केला आहे. सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता, असा प्रश्न राऊत यांनी शिंदेंना केला आहे. सर्वच स्तरांवरून त्रिवेदी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या प्रतिक्रियांना सुधांशू त्रिवेदी काय उत्तर देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे