कोलकाता, १२ जुलै २०२३ : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजपाने आतापासून त्याची तयारी सुरु केली आहे. मागील दोन निवडणुकांप्रमाणे तिसऱ्या वेळी मोठे मताधिक्क्य मिळवून सत्तेत जाण्याची भाजपने कंबर कसली आहे. पण त्याआधी भाजपाला झटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी ही धोक्याची घंटा मानली जाते.निवडणुकीचे हे निकाल निश्चितच भाजपाची चिंता वाढवणारे आहेत. लोकसभा आणि विधानसभेला भाजपाने ज्या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती, त्या मतदारसंघातही भाजपाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका हिंसाचारामुळे चांगल्याच चर्चेत आल्या. पंचायत निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. सत्ताधारी तृणमुल काँग्रेसच्या तुलनेत बऱ्याच भागात भाजपा पिछाडीवर आहे. २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ च्या विधासभा निवडणुकीत भाजपाने ज्या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती, त्या ठिकाणी सुद्धा भाजपा पिछाडीवर पडली आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात भाजपा, काँग्रेस आणि सीपीआय(एम) तिन्ही पक्ष मागे राहिले.
९ जून नंतर मुर्शिदाबाद आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात सर्वाधिक हिंसाचार आणि मृत्यू झाले आहेत. दक्षिण २४ परगणामध्ये तृणमुल काँग्रेसने ६३८३ ग्राम पंयायतीच्या जागापैकी २५६८ जागा जिंकल्या. मुर्शिदाबादमध्ये ५५९३ पैकी १४४१ जागा जिंकल्या. या दोन जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ६३% मुस्लिम लोकसंख्या आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. भाजपाने २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या १८ जागा जिंकून तृणमुल काँग्रेसला झटका दिला होता. २०२१ ला विधानसभा निवडणुकीत राज्यातील २९४ पैकी ७५ विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. दोन्ही निवडणुकीत उत्तर बंगालच्या आठही जिल्ह्यात भाजपाच्या कामगिरीने तृणमूल काँग्रेसची चिंता वाढवली होती.२०२१ मध्ये भाजपाने या आठ जिल्ह्यात ५४ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने विधानसभेला राज्यातील २९४ पैकी २१५ जागा जिंकल्या होत्या. उत्तर बंगालमधून भाजपाने लोकसभेच्या ८ जागा जिंकल्या होत्या.
भाजपाने मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या २५०७ जागांपैकी फक्त ३१५ जागा जिंकल्या होत्या. जलपायगुडी जिल्ह्यात भाजपाने १७०१ ग्रामपंचायत जागांपैकी फक्त १६१ जागा जिंकल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण दिनाजपुर जिल्ह्यात भाजपाने ग्रामपंचायतीच्या २२२० आणि १३०८ जागांपैकी ८२ आणि ३७ जागाच जिंकल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर