नागपूर, २४ जुलै २०२३: भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत १२० हून अधिक भाजप नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. माजी शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कुकडे म्हणाले की, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५ लाखांहून अधिक मतांनी विजयी करून शहरातील सर्व ६ विधानसभा जागांवर भाजपचा झेंडा फडकवू.
यावेळी व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंबरे, मोहन मते, ग्रामीण भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष सुधाकर कोहळे, संजय भेंडे, उपेंद्र कोठेकर, अर्चना डेहनकर उपस्थित होते. कुकडे म्हणाले की, शहरातील भाजपचे १५८ बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात कृष्ण-अर्जुनच्या भूमिकेत दिसणार आहेत. भाजप हे कुटुंब असून रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे नाते असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत सर्वजण मिळून काम करणार आहेत. वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खोपडे म्हणाले की, कुकडे हे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या सोबतीने पक्षसंघटना आणखी मजबूत केली जाईल.
महापालिका निवडणुकीत १२० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या कुकडे यांच्या संकल्पावर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी असल्याचे माजी शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी सांगितले. अध्यक्षीय कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. मोहन मते, कोठेकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. आमदार विकास कुंभारे यांनी आपल्या भाषणात बंटी कुकडे यांना बंटी शेळके संबोधले. बंटी शेळके हे काँग्रेसचे नेते असून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कुंभारे यांना कडवी झुंज दिली. शेळके यांची भीती अद्याप दूर झालेली नाही, असा टोला काहींनी लगावला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड