पुणे, ३ जून २०२३: विविध राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीला काही महिने उरले आहेत. नव्या युती आणि समीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी विरोधक एकत्र येऊन रणनीती ठरवत आहेत. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप किमान ३५० जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तसेच एनडीएच्या एकूण जागा ४०० च्या पुढे जातील.
म्हणजेच जितकी चुरशीची लढत असेल तितका भाजपचा विजय असेल, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार १२ जून रोजी पाटणा येथे बिगर भाजप पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस यात सहभागी होणार नाही.
अशा स्थितीत प्रकाश जावडेकर यांचा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहावे लागेल. २०२४ च्या निवडणुकीत भाजप किती मोठा विजय मिळवू शकेल? भाजपचा अश्वमेध रोखण्यात विरोधकांची एकजूट यशस्वी होणार का ? की भाजप पुन्हा एकदा विक्रमी विजय मिळवू शकेल ? सध्या सर्वच पक्षांची निवडणुकीची तयारी सर्व बाजूंनी सुरू झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड