विधानसभा पोटनिवडणुकीत अमित शाह यांच्यासह भाजपचे ४० स्टार प्रचारक करणार प्रचार

4

पुणे, १२ फेब्रुवारी २०२३ : पुण्यातील दोन जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. ता. २६ फेब्रुवारीला या पोटनिवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी २ मार्चला होणार आहे. महाराष्ट्रातील या पोटनिवडणुकांसाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. भाजपचे सर्वोच्च नेते अमित शहा हे १८ फेब्रुवारीला पुण्यात येत आहेत. १८ आणि १९ फेब्रुवारी या दोन दिवशी शहरातील अनेक कार्यक्रमांत ते सहभागी होणार आहेत. यासोबतच भाजपचे ४० स्टार प्रचारकही पोटनिवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहेत.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा राखण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे. त्यात चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि कसब्यात हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली असून, टिळकांच्या कुटुंबीयांना तिकीट नाकारले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप पोटनिवडणुकीसाठी कोणताही धोका पत्करत नाही आणि पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांना गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यमंत्री आणि भाजप नेत्यांचाही समावेश आहे.

त्याचवेळी, महाविकास आघाडीत जागावाटपाच्या व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रवादीने चिंचवडमधून नाना काटे यांना, तर काँग्रेसने कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये शरद पवार यांच्याशिवाय खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यातील इतर नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा