पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपचा पराभव, नाशिकमध्येही फटका

पुणे, ४ डिसेंबर २०२०: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपानं प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय. यासह भाजपला औरंगाबाद मध्ये देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय.

नागपूर हे भाजप साठी बालेकिल्ला मानला जातो तर पुण्यामध्ये देखील भाजपची पकड चांगली होती. विशेष करून नागपूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडंच होता. तर दुसरीकडं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. परिषदेच्या ६ जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयी गुलाल लावला आहे. अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतं पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता आणि हा कोटा लाड यांनी पूर्ण केला. अरुण लाड यांचा संग्राम देशमुखांवर तब्बल ४८ हजार ८२४ मतांनी विजय मिळवला.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

पुण्यानंतर भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले आहे. यापूर्वी दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी यावेळी विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा