पुणे, दि.२३ मे २०२०: कोरोना होऊ नये यासाठी आयुषने प्रतिकार क्षमता वाढवणारे औषध म्हणून “आर्सेनिक अल्बम” ची शिफारस देशभरात केली. त्यामुळे या औषधाचा राज्यात काळाबाजार होऊ लागला. असल्याची परिस्थिती आता समोर येऊ लागली आहे.
एकीकडे होमिओपॅथी डॉक्टरांना औषधांची चणचण भासू लागली आहे तर दुसरीकडे मेडिकल दुकानात या औषधांचा सुळसुळाट झाल्याने या औषधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही डॉक्टर आर्सेनिक अल्बम या औषधाचे वाटप करत आहे. मात्र, त्यांना बाजारात हे आर्सेनिक अल्बम औषध सहज उपलब्ध होत नाही. या औषधांची जर्मनीमधून आयात करावी लागतात. मात्र डॉक्टरांना ही औषधे देण्यासाठी दुसऱ्या वितरकांवर अवलंबून राहावे लागत आहे. रुग्ण अर्सेनिक औषध मागत असल्याने डॉक्टरांची कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.
यबाबत एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या बाजारपेठेत अर्सनिक अल्बम औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते ही औषधे सर्रासपणे मोफत वाटताना दिसत आहे. त्यामुळे मोफत वाटली जाणारी ही आर्सेनिक अल्बम हे औषधे खरी आहेत का यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
या आर्सेनिक अल्बमचा तुटवडा असल्याने ही मोफत वाटली जाणारी औषधे बनावट असल्याचा संशय आता व्यक्त होऊ लागली आहे. अशा संशय काही होमिओपॅथी डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते जे काही विकत आहेत ते कोणते औषध आहे हे आम्हालाही माहीत नाही अशी प्रतिक्रिया होमिओ फार्मसी वितरकाने दिली आहे.
आर्सेनिकचा तुटवडा असल्याचं सांगत असल्याने डॉक्टरांच्या असोसिएशनने याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. बाजारात काही मेडिकल्समध्ये हे औषध अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात असल्याने अन्न-औषध प्रशासनानेही आता या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
साबुदाण्या सारख्या दिसणाऱ्या सर्व गोळ्या सारख्याच असतात. यात सर्वसामान्याला कुठले औषध आहे हे मात्र समजत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने तज्ञ माणसाकडून माहिती घेऊनच हे औषध खरेदी करण्याची गरज आहे. अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याचे होमिओपॅथी डॉक्टरांनी वर्तवले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर