कल्याण डोंबिवलीत कोरोनावरील इंजेक्शन्सचा काळा बाजार

कल्याण, दि. १३ जुलै २०२०: कल्याण डोंबिवली मध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा काळा बाजार होत आहे त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. तसेच ही इंजेक्शन्स राज्य सरकारने अल्प दरात किंवा महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांसाठी आवश्यक इंजेक्शन आणि औषध-इंजेक्शनचा तुटवडा झाल्याचे भासवून मूळ किमतीपेक्षा तीन ते चार पट किंमतीमध्ये चढ्या दराने त्याची विक्री होत असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. तसेच हे औषध मुंबईत ठराविक ठिकाणीच उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या किंमतीमध्ये नाईलाजाने लोक खरेदी करत असून या औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

एकीकडे कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले असून लोकांचे रोजगारही गेले आहेत. अशा महामारीत रुग्णांना ही महागडी औषधे विकत घेणे आवाक्याबाहेर असल्याने राज्य सरकारने ती आपल्या माध्यमातून अल्प दरात उपलब्ध करून देण्याची सूचनाही आमदार गायकवाड यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा