कंधार, 16 ऑक्टोंबर 2021: अफगाणिस्तानच्या कंधार येथील शिया समुदायाच्या मशिदीवर शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीच्या अहवालांनुसार यामध्ये 32 लोकांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी झाले. हा स्फोट शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झाला. सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तानात शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आलंय.
गेल्या शुक्रवारी 100 हून अधिक लोकांचा मृत्यू
गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानच्या कुंदुज शहरात शिया मशिदीत नमाज पढताना मोठा स्फोट झाला. यामध्ये 100 लोक ठार झाले, तर 10-12 जखमी झाले. रिपोर्ट्सनुसार, स्फोटाच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक उपस्थित होते. कुंदुजचे उपपोलिस प्रमुख मोहम्मद ओबैदाह म्हणाले की मशिदीतील बहुतेक लोक मारले गेले.
IS ने जबाबदारी स्वीकारली, म्हणाले- शिया मुस्लिम आमच्या निशाण्यावर
इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनं गेल्या आठवड्यात या फिदाईन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संघटनेनं म्हटलं की, आमचे लक्ष्य शिया मुस्लिम आणि त्यांच्या धार्मिक संस्था आहेत. आयएसशी संबंधित आमक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने साइट इंटेलिजन्स ग्रुपने याची पुष्टी केली. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यावर हा देशातील सर्वात मोठा हल्ला होता. कुंदुजमधील संस्कृती आणि माहिती संचालक मतिउल्लाह रौहानी म्हणाले की, हा आत्मघातकी हल्ला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे