धुळे, ८ जून २०२३ : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कांद्याचा दर दिवसेंदिवस घसरत असल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत खासगी कृषी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन, निषेध व्यक्त केला. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये भावाने कांदा विकावा लागत आहे.
कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याच्या भावाच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही कांदा पिकातून निघत नाही. सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. मात्र, तरी देखील भावात सुधारणा झालेली नाही. आता तरी शासनाने वेळीच दखल घेऊन कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
खरीप हंगामाची तयारी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगात सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. जिल्ह्याला कपाशीच्या वाणाचे ८ लाख ८८ हजार पाकीट, तसेच ७० हजार १६१ मेट्रिक टन खत मिळाले आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर मे महिन्यात उन्हाचा तडाखा होता. तसेच तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कपाशीची लागवड करतात. त्यानुसार यंदाही अनेक शेतकऱ्यांचा कल कपाशीची लागवड करण्याकडे असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामासाठी धुळे जिल्ह्याला कपाशीच्या १० लाख ३० हजार ६४० बीटी पाकिटांची गरज होती. त्यानुसार ८ लाख ८८ हजार पाकीट उपलब्ध झाली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर