ग्रामीण भागातील रक्त वाहिनी पुन्हा सुरू करणे आवश्यक: आमदार संजय जगताप

पुरंदर, दि.१७ ऑगस्ट २०२०: एस. टी. ही ग्रामीण भागांची रक्तवाहिनी आहे.ती जास्त दिवस बंद ठेवणे योग्य नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी व इतर प्रवाशांना एस.टी.बस वर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे आता एसटी सुरू होणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आता आपण लवकरच ही सेवा पूर्ववत सुरू करूयात असे पुरंदरचे आमदार संजय यांनी सासवड मध्ये याबाबत झालेल्या बैठकीत म्हटले आहे.

लाल परीला रस्त्यावर आणण्यासाठी आमदार संजय जगताप यांनी सासवड एस.टी आगारात एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरुंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे, दीपक घोडे, विभागीय स्थापत्य अभियंता विजय रेडेकर, रंजीत आनंदे उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले १९८७ साली अनंतराव थोपटे साहेब मंत्री असतानाच्या काळात सासवड एस.टी आगाराला मंजुरी मिळाली होती. गेल्या दोन वर्षापासून एसटी बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असून त्याचा आढावा घेऊन पुढील सुविधा उपलब्ध करावयाचे आहेत. सासवड व जेजुरी या ठिकाणच्या बस स्थानकावरील प्रवाशांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी व प्रवाशांना यांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सासवड आगारातील बैठकीत आ. जगताप यांनी सांगितले.

यापूर्वी सासवड आगारातून दररोज २८० फेऱ्या ग्रामीण भागामध्ये होत होत्या व सासवड आगाराकडे ५० बसेस आहेत. ११० चालक ९० वाहक व इतर ४६ कर्मचारी आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने सासवड आगार तोट्या मध्ये आहे.

आता सध्या ६ फेऱ्या सुरू आहेत. यामध्ये सासवड ते पुणे, सासवड ते वीर, सासवड ते निरा, सासवड ते भिसेवाडी अशा फेर्‍या सुरू असल्याचे सासवड आगार व्यवस्थापिका मनीषा इनामके यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा