चिपळूण, रत्नागिरी १४ डिसेंबर २०२३ : मतदार यादी तयार करण्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे म्हणजेच ‘बीएलओं’चे योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दात रत्नागिरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी ‘बीएलओं’चे गौरव केला. चिपळूण तहसील कार्यालय येथे गायकवाड यांनी भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पाहणी केली. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले, मतदार यादी बनविण्यासाठी यादीभागात बीएलओ प्रत्यक्ष जाऊन माहिती घेऊन काम करत आहेत. एक प्रकारे ते निवडणूक आयोगाचे स्तंभ आहेत. अत्यंत उत्तम पध्दतीने काम सुरु आहे. अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, असे सांगून उपस्थित सर्व शंकांचे त्यांनी यावेळी निरसन केले.
निवडणूक शाखेमध्ये इव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती केंद्राला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. येणाऱ्या मतदारांच्या नोंदी ठेवून प्रात्यक्षिकाद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डाटा एन्ट्रीबाबतही पाहणी करुन त्यांनी मार्गदर्शन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर