पिंपरी, २७ जुलै २०२३ : पिंपरी-चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून शहरातील वायू व ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेने पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक व्हेईकल रेडिनेस आराखडा तयार केला आहे. येत्या तीन वर्षात शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा महापालिकेने केलाय.
हा आराखडा महापालिकेच्या इलेक्ट्रिक व्हेईकल सेलने रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट यांच्या सहाय्याने तयार केला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल वाहनांना चालना देण्यासाठी नऊ कृती उपाय या आराखड्यात सुचविले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सारख्या पायाभूत सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहोत, यामुळे शहराचे वातावरण अधिक स्वच्छ बनेल असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
आगामी २०२६ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे योगदान देण्याचे प्रस्तावित आहे. हे लक्ष्य साध्य केल्यास शहरातील वाहनांमुळे होणारे कार्बन उत्सर्जन ०.८ दशलक्ष टन कमी होऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांमुळे शहरात डिकार्बोनायझेशनच्या प्रकियेला गती मिळणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर