मुंबई, १५ फेब्रुवारी २०२३ : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. दहावी, तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अज्ञात व्यक्तींना प्रवेशबंदी असेल.
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेसंदर्भातील संवेदनशीलतेच्या आधारे केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात येणार आहे. यावर्षी महाराष्ट्र बोर्ड १२वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. बोर्डाने डेटशीट आधीच प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर १२वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेचा तपशील पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. शाळेत प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थी प्रवेशपत्राची हार्ड कॉपी संबंधित शाळेतून घेऊ शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. दोन्ही वर्गांची पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. आणि दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी ३ ते ६ या वेळेत घेतली जाईल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड