म्यानमार, ११ ऑगस्ट २०२३ : म्यानमारमधील राखिने राज्यातून मलेशियाकडे निघालेली बोट समुद्रात बुडाल्याने २३ रोहिंग्या मुस्लिमांचा मृत्यू झाला आहे, तर ३० लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर या दुर्घटनेत ८ जण बचावले आहे. रोहिंग्या राज्याची राजधानी सिटवे येथे ही घटना घडली. म्यानमारमधून मलेशियाकडे बेकायदेशीररित्या नेणाऱ्या तस्करांची ही बोट होती. ही बोट बुडल्यानंतर या तस्करांनी पलायन केले आहे. अशा प्रकारे मलेशियात नेण्यासाठी एका माणसांकडून हे तस्कर चार हजार डॉलर इतके पैसे घेतात.
राखिने येथील हिंसाचारानंतर तेथील अनेक विस्थापित मुस्लिमांनी बांगलादेशात आसरा घेतला आहे. आता जे राखिनेमध्ये राहतात, तेही अन्यत्र जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बोटवर ५० लोक होते. समुद्रातील हवामान बिघडल्याने ही बोट बुडाली. आतापर्यंत २३ मृतदेह मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १३ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. अजून शोधकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर