औरंगाबाद येथे बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’तर्फे दीड हजार मुलींना करणार सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप

औरंगाबाद, ६ फेब्रुवारी २०२३ : शहरातील विविध भागांतील शाळांमधील दीड हजार मुलींना मुंबई येथील ‘मेकिंग द डिफरन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ व एनजीओ ‘बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’च्या वतीने सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच शहरातील खासगी संस्थेच्या शाळांतील मुलींची विनामूल्य मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ तसेच सॅनिटरी पॅड वाटप हे येत्या शुक्रवारपासून (ता.१० फेब्रुवारी) औरंगाबाद शहरातील संत कबीर विद्यालय, (नक्षत्रवाडी) येथून होणार आहे.

शहरातील खासगी संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या बहुसंख्य मुली या स्लम एरियातील आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या असून, मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे त्यांच्या पालकांना परवडत नाही; तसेच या मुलींना व त्यांच्या पालकांना नॅपकिन कसे वापरावेत, याची माहिती नसते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई येथील ‘मेकिंग द डिफरन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ व औरंगाबाद येथील एनजीओ ‘बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीड हजार मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या पाळीच्या दिवसांतील वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने मुलींच्या आरोग्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करून मोफत किट वाटप करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या सचिव मीरा वाघमारे, प्रेरणा आझादे, प्रणाली उघडे यांनी कळविले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा