बोलेरो गाडीची उभ्या ट्रकला धडक, अपघातात सात जणांचा मृत्यू

बांदा,३० जून २०२३ : उत्तर प्रदेश मधील बांदा जिल्ह्यात गुरुवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. अत्यंत वेगात आलेली बोलेरो गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात बोलेरो गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारा हा अपघात होता. या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बांदा जिल्ह्यातील बबेरू पोलीस ठाण्याअंतर्गत बांदा कमासिन रोडवर हा अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा एक बोलेरो आठ लोकांना घेऊन जात होती. ही बोलेरो बेसुमार वेगात होती. त्यावेळी बांदा-कमासिन रोडवर एक ट्रक उभी होती. या कारने थेट ट्रकलाच धडक दिली आणि कार ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे बोलेरोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कार अत्यंत वेगात ट्रकला धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी त्यांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे दिसले.

या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण कारचा इतका चक्काचूर झाला होता की कार मधील लोकांना बाहेर काढणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कटर मागवली आणि कारचा दरवाजा कापून काढला. त्यानंतर सर्व जखमींना कारमधून बाहेर काढले आणि त्यांना स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले. या अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकच जण वाचला आहे. पण त्याचीही प्रकृती गंभीर असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार अत्यंत वेगाने येत होती. ही कार अनियंत्रित झाली आणि या कारने ट्रकला धडक देत ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे हा अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असे उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा