मुंबई, ३० ऑगस्ट २०२२: वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे कायम चर्चेत असणाऱ्या कमाल आर खान उर्फ KRK हा वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. चित्रपट असो वा कलाकार सर्वांवर तो टीका करत असतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून तो टीका करत असतो. केआरकेला वादग्रस्त ट्वीट केल्यासंदर्भात पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे.
कमाल आर. खान याला मालाड पोलिसांनी अटक केली. २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
काय आहे प्रकरण?
केआरके हा सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केआरकेनं एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानं ट्विटच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं. त्यामुळे त्याच्याविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केआरके भारतात नव्हता. तो भारतात परत येण्याची वाट पोलीस बघत होते. दोन वर्षांनंतर कमाल आर खान मुंबई एअरपोर्टवर पोहचला, याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर एक विशेष पथक मुंबई पोलिसांनी एअरपोर्टवर पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कमाल आर खानला ताब्यात घेतलं.
आपल्या ट्विट्समुळे वादात सापडण्याची केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूड कलाकारांविरोधात, क्रिकेटर्सविरोधात आणि इतर मोठ्या सेलिब्रिटींविरोधात वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. केआरके त्याच्या ट्विट्समध्ये शाहरुख आणि सलमानलाही बरं-वाईट बोलला आहे. केआरकेनं सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाचं अत्यंत नकारात्मक समिक्षण केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यात त्याने सलमानवरही अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर सलमानने केआरकेविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. कमाल खानने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव