पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू

कोलकता, ३ डिसेंबर २०२२ : बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगरमध्ये टीएमसी नेते राजकुमार यांच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात दोन टीएमसी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यासह काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिदनापूर जिल्ह्यातील कांथी परिसरात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची आज शनिवारी सभा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वीच शुक्रवारी रात्री या गावात भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात टीएमसीचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांचे घर पूर्णपणे उध्वस्त झाले असून, दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला.

  • भाजपचा गंभीर आरोप :

तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरी बॉम्ब तयार केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात बॉम्ब बनवण्याचा उद्योग फोफावत आहे, असेही भाजपचे म्हणणे आहे. तर सीपीआय (एम)चे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, टीएमसीचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी, विरोधक कोणत्याही पुराव्याशिवाय सत्ताधारी पक्षावर टीका करत असल्याचे म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा