नाशिक, १७ मे २०२३ -: महाविकास आघाडीचे नेते असलेले संजय राऊत यांचा हिंदुत्वाशी संबंध काय ? असा प्रश्न हिंदुत्ववाले उपस्थित करत आहेत. यावर नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारण्याचे प्रकार सुरू असल्याची टीका असल्याचे संजय राऊत यांनी केली. ते नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलत होते.
त्र्यंबकेश्वर आमच्या श्रद्धेचा आणि अस्थेचा विषय असल्याचे सांगत राऊत म्हणाले, कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावले आहे. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. ऊरूस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संदलची परंपरा मागील १०० वर्षां पासूनची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात काही हिंदूसह संघाचे लोकही आहेत. मला माहीत आहे. पोलीसही चादर चढवतात असे राऊत म्हणाले. परंतु त्र्यंबकेश्वरच्या नावाने महाराष्ट्रातील वातावरण उद्ध्वस्त करायचे प्रकार सुरू आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी केली.
त्र्यंबकेश्वर प्रकरणावर एसआयटी नेमण्याच्या दिलेल्या आदेशावर बोलताना संजय राऊत म्हणाले, एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. त्यावर एसआयटी का नाही नेमली? असा सवालही राऊतांनी सरकारला केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर