एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या स्वप्नील गरड यांचा ‘ब्रेन डेड’ ; पुणे पोलीस दलात आहे कायर्रत

पुणे, २ जून २०२३: पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक स्वप्नील गरड यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे ब्रेन डेड झाल्याची माहिती पुणे पोलिस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली आहे. गरड हे पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी ते गेले होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

गरड हे उत्तम गिर्यारोहक असून, त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखरे सर केली आहेत. गरड यांनी मागील वर्षी जगातील सर्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माऊंट अमा दबलम शिखर सर केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तिरंगा फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.

गरड हे एव्हरेस्ट शिखर सर करून खाली आले होते. त्यानंतर, अचानक चक्कर येऊन ते कोसळले. त्यांच्यावर नेपाळमधील काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. एक एप्रिल पासून ते सुट्टीवर होते. त्यांना पुण्यात घेऊन येण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. पोलिसांचे एक पथक नेपाळकडे रवाना झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा