ब्राझील(वृत्तसंस्था) : ब्राझील येथे “आय चुज टू वेट” असे सरकारी अभियान सुरू करण्यात आले आहे. याचा अर्थ लग्नापर्यंत संयम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘टीनएज प्रेग्नेंसी’ म्हणजेच कुमारी माता आणि ‘एचआयव्ही’ बाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आल्यानंतर सरकार मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळेच ‘आय चूज टू वेट’ अभियानाद्वारे ब्राझील सरकारनं तरुणांना आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत ब्राझील सरकारचे मानवाधिकार आणि कुटुंबकल्याण मंत्री डामारेस एल्वेस म्हणाले की, ‘आपल्या देशातील तरुण सामाजिक दबावाखाली शारीरिक संबंध ठेवतात. सेक्स शिवायदेखील तुम्ही पार्ट्यांचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने उपभोगू शकता’.
याबद्दल अधिक माहिती देताना डामारेस यांनी सांगितले की, तरुणांना लग्नाआधी सेक्स करण्यापासून रोखण्यासाठी ‘आय चूज टू वेट’ नावाचे एक सरकारी अभियान देखील सुरू करण्यात आलं आहे. हे अभियान आणि तरुणांमध्ये जागरुकता आणण्यासंदर्भात आपण असंख्य फॉलोअर्स असलेल्या चर्चच्या फादर्ससोबत देखील चर्चा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यानंतर डामारेस यांनी दिलेल्या माहितीनंतर, लॅटीन अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलमध्ये प्रजनन अधिकारी आणि लैंगिक शिक्षण यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नव्या अभियानाला पाठिंबा देणारे आणि त्या विरोधातले असे दोन्ही वर्ग आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.
डावे पक्ष आणि या अभियानाला विरोध करणाऱ्यांनी आरोप केला आहे की, लैंगिक भावनांवर संयम ठेवण्यासाठी सरकारकडून ज्याप्रकारे माहिती दिली जात आहे, ती दिशाभूल करणारी असून तरुणांच्या स्वास्थासाठी धोकादायक ठरू शकते. ब्राझीलमधील सामाजिक कार्यकर्ता देबोरा डिनिज यांच्या म्हणण्यानुसार, सेक्सवर संयम ठेवण्यासंदर्भात आतापर्यंत बनवण्यात आलेले नीती नियम हे कायम निष्प्रभ ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषत: किशोर वयातील गर्भधारणा आणि लैंगिक आजार रोखण्यासंदर्भातील असले उपाय यशस्वी झाल्याचे कधीही पाहायला मिळाले नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
डिनिज हे कायद्याचे प्राध्यापक देखील असल्याने त्यांनी विविध उदाहरणांच्या आधारे आपली बाजू मांडली आहे. तसेच पुराण धर्माच्या आधारावर नीती नियम बनवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोप आहे की, डाव्या पक्षांनीच तरुणांची दिशाभूल केली असून तरुणांना लग्नाआधी सेक्स करण्यास ते प्रोत्साहित करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत ब्राझीलमध्ये कुमारी मातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक स्तरावर कुमारी मातांचे प्रमाण हे ४४ टक्के आहे तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण ६२ टक्के आहे. त्यामुळे या अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे.