पुणे, ३१ जुलै २०२३ : तेलंगाणा राज्यात सत्तेवर असलेला के चंद्रशेखर राव याचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर विसरण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात प्रवेशाची याची सुरुवात मराठवाड्यातील नांदेडमधून झाली. के चंद्रशेखर राव यांची पहिली सभा नांदेड मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विदर्भकडे वळवला.नागपूरमध्ये बीआरएस कडून सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भातील काही माजी आमदारांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बीआरएस मध्ये पक्ष प्रवेश केला.
एक महिन्यांपूर्वी आषाढी एकादशीला के चंद्रशेखर राव हे आपले तेलंगणातील मंत्रिमंडळ, आमदार,खासदारांसह दोन दिवसीय सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आषाढी एकादशीला विठुरायचे दर्शन घेतले.त्यानंतर पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके याचे पुत्र भगीरथ भालके याचा बीआरएस पक्षामध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम केसीआर यांच्या हस्ते पार पडला.
आता राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाची जोरदार चर्चा असून, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात बीआरएस पक्षात प्रवेश करणारांचा ओघ वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.
के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. के चंद्रशेखर राव हे उद्या (१ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहचणार आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील, त्याचबरोबर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर