बीएसएनएल मधील कंत्राटी कामगार एक वर्षापासून बिन पगारी

3

केरळ, दि. १३ जून २०२०: सरकारी स्वामित्व असलेली कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये असलेल्या ५०,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळून तब्बल दहा महिने होऊन गेले आहेत. म्हणजेच जवळपास एक वर्षापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. याचे कारण देताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की कंपनीकडे वित्त तुटवडा असल्यामुळे कामगारांचे वेतन प्रलंबित राहिले आहे.

केरळमधील ६,००० कामगारांसह सुमारे ५०,००० कर्मचार्‍यांना मागील फेब्रुवारीपासून पगार मिळालेला नाही. केरळमध्ये ८०७६ कर्मचारी आहेत परंतू त्यापैकी १००० हून अधिक कर्मचारी फेब्रुवारीनंतर निलंबित करण्यात आले. केरळ मध्ये ओनम हा सण जल्लोषात साजरा केला जातो परंतु हा सण देखील कर्मचाऱ्यांना विना वेतनाचेच पार पाडावे लागतात. या सर्व प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनी संतापून सप्टेंबर २०१९ पासून संप पुकारला आहे.

५ नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे मुख्य महा व्यवस्थापकांसमवेत संघटनांनी केलेल्या चर्चेला देखील कोणतेही चांगले परिणाम मिळाले नाहीत. यावेळी केरळमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून सांगण्यात आले की फक्त केरळमधील कर्मचाऱ्यांसाठी कंपनी पाऊल उचलू शकत नाही. कारण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या पूर्ण देशभरातील कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची देखील आहे. याच मागणीसह कर्मचारी बीएसएनएल चे अध्यक्ष पी. के. पुरवार यांच्याकडे गेले असता त्यांनी कंत्राटी कामगारांसाठी कंपनीकडे निधी नसल्याचे सांगितले.

कर्मचार्‍यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) असे फायदे होते म्हणूनच अल्प वेतन असून देखील कर्मचारी काम करण्यास तयार झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या समस्येविषयी बीएसएनएल कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट लेबरर्स युनियनचे कार्याध्यक्ष के. मोहनन म्हणाले की, “कंपनीने कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. सध्या अडचणीच्या या काळात कंपनीने कर्मचाऱ्यांना थोडा तरी दिलासा द्यायला हवा. कंत्राटी कामगारांनाही जीवन आहे आणि त्यांना त्वरित पगार देण्यात यावा. कर्मचाऱ्यांनी आपला असंतोष दर्शवण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करण्याआधीच केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करावे”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा