बसपा प्रमुख मायावतींनी काँग्रेसवर साधला निशाणा; म्हणाल्या…

लखनऊ, २० ऑक्टोबर २०२२: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यात अध्यक्षपदासाठीची चुरस होती. यामध्ये शशी थरूर यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करत वयाच्या ८० व्या वर्षी मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाले आहेत. मात्र, या निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.

मायावती यांनी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे ‘बळीचा बकरा’ असे वर्णन केले आहे. पुढे त्या म्हणाल्या, काँग्रेसचा इतिहास साक्षी आहे की, त्यांनी दीन-दलित, परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा वारंवार अपमान केला आहे. या पक्षाला त्यांच्या चांगल्या दिवसात दलितांची कधीच आठवण होत नाही. मात्र, वाईट काळात काँग्रेसला दलितांची आठवण येते.

आणखी एका ट्विट करत मायावती यांनी काँग्रेसवर दलितांच्या भावनांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, काँग्रेस पक्षाला आपल्या चांगल्या दिवसांच्या दीर्घकाळात बहुतांश गैर-दलितांची आठवण होते आणि सध्याच्या वाईट दिवसात दलितांची आठवण येत आहे. हे फसवं राजकारण नाही का? हेच काँग्रेसचे दलितांवरचं खरं प्रेम आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा