कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प: हर्षवर्धन पाटील

इंदापूर, १ फेब्रुवरी २०२१: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच उत्पादीत शेतीमालास दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अतिशय कल्पक व देशाच्या प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणाचे १६.५ लाख कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच कृषी उत्पादन निर्यातीमध्ये आणखी २२ कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.७५ हजार ६० कोटी, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.१०,५०३ कोटी, भातासाठी रू. १ लाख ७२ हजार ७५२ कोटीची भरीव तरतुद तसेच १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाइन यंत्रणेशी जोडण्याचे उद्दिष्ट हे कृषी क्षेत्रासाठी स्वागतार्ह आहे.”

तसेच ग्रामीण सुधारण्यासाठी रू. ४० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. उज्वला गॅस योजना आणखी १ कोटी नागरिकांना देणे, पंतप्रधान आत्मनिर्भर आरोग्य योजना सुरु करणे, सर्वांना शिक्षण देण्याचे लक्ष ठरविणे त्यामुळे हा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा