लखनऊ, २५ जानेवारी २०२३ :उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील वजीर हसन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी इमरतीचा मालक असलेल्या सपा आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या वजीर हसन रोडवर पाच मजली इमारत कोसळली असून, या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळत असताना इमारतीत ८ कुटुंब होती. आत्तापर्यंत १४ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत आणखी व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अजूनही बचाव कार्य सुरु आहे.
या प्रकरणी सपाचे किठोर आमदार आणि इमारतीचे मालक माजी कॅबिनेट मंत्री शाहिद मन्सूर यांचा मुलगा नवाजीश मन्सूर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाची माहिती घेतली असून, जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.