बुलडोझरचा कहर: पुण्यात ११,००० दुकाने जमीनदोस्त, व्यापारी निराधार!

21

पुणे २१ फेब्रुवारी २०२५ :– पुण्यात अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार कारवाई करण्यात येत असून, नुकतेच कुदळवाडी, जाधववाडी आणि पवार वस्ती या भागांतील तब्बल ११,००० दुकाने पाडण्यात आली. सकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे करोडो रुपये उद्ध्वस्त झाले. छोट्या व्यावसायिकांपासून गोडाऊन आणि कंपन्यांच्या मालकांपर्यंत सर्वांनाच या कारवाईचा फटका बसला आहे.

“अनधिकृत” की अन्याय?”

स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे की, ज्या दुकानांवर कारवाई करण्यात आली ती दुकाने त्यांच्याच नावावर होती. काही दुकानांवर केवळ पत्र्याचे छप्पर असल्यामुळे ती तोडण्यात आली, तर काहींनी जागेच्या मर्यादेबाहेर व्यवसाय वाढवला म्हणून कारवाई झाली. परंतु, व्यापाऱ्यांचा आक्षेप आहे की, स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्या नातेवाईकांचे घर आणि कंपन्या मात्र याच परिसरात असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

“आमच्यावर नियम लावले, मग त्यांच्यावर का नाही?” असा सवाल आता व्यापारी करत आहेत.

न्याय मागणारे दुकानदार रस्त्यावर

या मोहिमेमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक व्यापारी आणि कुटुंबीय आमदारांच्या दारात न्याय मागण्यासाठी उभे आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

एक व्यावसायिक सांगतात, “आमच्यावर सरळ बुलडोझर चालवला, पण आमच्या विरोधाचा कोणालाही फरक पडला नाही. आमच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. आता घर चालवायचं कसं? मुलांना काय खाऊ घालायचं?”

“आमच्या घामाचा मोबदला कोण देणार?”

कारवाईदरम्यान अनेक बायका अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी बोलताना दिसल्या. एका महिलेनं सांगितलं, “आमच्या हातावर पोट आहे. रोज कमावलं तरच पोट भरतं. आता दुकानच राहिलं नाही, तर जगायचं कसं? आमच्या संसाराचा विचार कुणी करणार आहे का?”

या मोहिमेवेळी प्रशासनानं साडेसहाशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. स्थानिक व्यापाऱ्यांनी अनेकदा विनवण्या केल्या, मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, “बांधकाम अनधिकृत असेल, तर सगळ्यांच्यावर एकसमान कारवाई का नाही? काहींना वाचवलं गेलं आणि आम्हीच बळी का ठरलो?”

“बुलडोझर केवळ आमच्यासाठी?”

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, कारवाईमधून काही लोकांना सवलत का देण्यात आली? नियम सर्वांसाठी सारखे असताना, केवळ सामान्य व्यापारी आणि गरीब दुकानदारांनाच लक्ष्य का करण्यात आलं?

या विषयावर स्थानिक प्रशासन आणि आमदार महेश लांडगे यांनी अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. आता पुढील घटनाक्रम कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही केवळ अनधिकृत बांधकामावरची कारवाई होती की, सामान्य व्यापाऱ्यांना उध्वस्त करण्याचा कट? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा