वांद्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, शाखा अनधिकृत असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा

12

मुंबई २२ जून २०२३: मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केलीय. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने धडक कारवाई केली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या रिक्षा चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असुन, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. मुंबई महापालिकेची कारवाई सुरू होताच शिवसैनिकही तिथे जमले. वॉर्ड क्रमांक ९६ चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय असून फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. कारवाई मध्ये हे कार्यालय तोडण्याचे काम सुरू आहे.

वांद्र्यातील ज्या शाखेवर महापालिका कारवाई करतेय ती शाखा ४० वर्षे जुनी आहे. १९९५ च्या झोपड्यादेखील आपण अधिकृत केल्या, मग ४० वर्षे जुनी शाखा अनधिकृत कशी? असे महापालिका कसे काय ठरवू शकते? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलाय. गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेने कारवाई करत असुन हे योग्य नाही, असेही अरविंद सावंत म्हणाले.

वॉर्ड क्रमांक ९६ चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मी दहा कोटींची ऑफर नाकारल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे हाजी हलीम खान यांनी म्हटले आहे. या कारवाई आधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. मला शिंदे-गट शिवसेनेने ऑफर दिली ती मी नाकारली, म्हणून महापालिकेने ही कारवाई केलीय. पण मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत राहिल, असे हाजी हलीम खान यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा