संचमान्यतेचे नवीन परिपत्रक रद्द करा; पुरंदर मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेची मागणी

पुरंदर, दि. ९ सप्टेंबर २०२०: शासनाने नव्या संचमान्यतेनुसार राज्यातील माध्यमिक शाळांवर जाचक अटी व नियम लादले आहेत. या जाचक अटींमुळे राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे जाचक परिपत्रक रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, पुरंदर संघाचे कार्याध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज पुरंदरच्या तहसीलदारांकडे दिले आहे.

शिक्षण विभागाने 13 जुलै रोजी प्रसारित केलेल्या सुधारित संचमान्यतेचे निकष चुकीचे व जाचक आहेत .पूर्वी इयत्ता निहाय चार गटांसाठी संचमान्यता दिली जात होती. आता विद्यार्थी संख्येनुसार दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडण्याची भीती मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. या नवीन परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. २८ ऑगस्ट २०१५ रोजीचा सेवक संच मान्यतेच्या परिपत्रकात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र नव्याने झालेल्या या परिपत्रकामुळे शिक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.

या नव्या संचमान्यतेमुळे राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तिव धोक्यात येण्याची शक्यता असून ग्रामीण भागातील बहुजन समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कला, क्रीडा, व कार्यानुभव विषयाच्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. राज्यभर शिक्षक संघटनांनी या संचमान्यता परिपत्रकाला विरोध केला असून पुरंदर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेच्या वतीने पुरंदर तहसीलदार यांना हे संचमान्यतेचे परिपत्रक रद्द व्हावे यामागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे सुधाकर जगदाळे, रामदास शिंदे, शिक्षक संघाचे वसंतराव ताकवले, इस्माईल सयद, तानाजी झेंडे, दिलीप पापळ, बाबुराव गायकवाड, संदीप चाचर आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा