बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद

लोणी काळभोर, ६ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आगे. बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसच्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने महाराष्ट्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मोठी आर्थिक चणचण भासत आहे.

ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवाराकडे सद्यस्थितीत पैसे नाहीत. प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच सचिव पराग जैन- नानुटीया यांनी केलेल्या सूचनांनुसार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले. त्याबाबत सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गासाठी ९० हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. या प्रशिक्षणाची सुरुवात २४ जुलै २०२० रोजी झाली असून या प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण युट्युब व फेसबुक वर होत असून याचा दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना लाभ होत आहे. महाराष्ट्रातील सर्व भागातील उमेदवारांनी या प्रशिक्षणास मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. जे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी या चॅनेलवर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा