नवी दिल्ली, दिनांक ३० ऑगस्ट २०२२: दिल्लीतील शिक्षण विभागात आर्थिक घोटाळा, केल्याचा आरोप ठेवून काही दिवसापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, यांच्या घरावर सीबीआय कडून छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने गती दिली आहे. आज सिसोदिया यांच्या बँकेतील लॉकरची तपासणी करण्यात आली. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा सध्या सक्रीय झाल्याचं दिसतंय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या लॉकरची तपासणी सीबीआयकडून करण्यात येत आहे. गाजियाबाद येथील वसुंधरा सेक्टर चार या ठिकाणच्या पंजाब नॅशनल बँकेत सिसोदिया यांचे लॉकर आहे तिथे सीबीआयचे पथक पोहचले आणि त्यांच्या बँक लॉकरची तपासणी केली आहे. यावेळी मनीष सिसोदियांसह त्यांच्या पत्नी ही उपस्थित होत्या.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही ईडीने अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूलच्या नेत्याला नोटीस बजावली आहे. कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूलचे नेते, खासदार अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस पाठवली आहे. दोन सप्टेंबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी– अनिल खळदकर