नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२२: नव्या मद्य धोरणाची गरज का होती? यात तुमचा किती हस्तक्षेप होता? नवे धोरण आणण्यासाठी झालेल्या बैठकीत कोण-कोण अधिकारी सहभागी होते? धोरण योग्य होते तर मागे का घेतले? बैठकांमध्ये मद्य व्यापारी व खासगी व्यक्ती सहभागी होते? अभिषेक बोइनपल्लीला कसे ओळखता? अर्जुन पांडेय, विजय नायरला कधीपासून ओळखता? अभिषेकच्या कंपनीत समीर महेंद्रूने ४ कोटी रुपये ट्रान्सफर केले, याची तुम्हाला माहिती होती? असे अनेक प्रश्न विचारत सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदियांची ९ तास चौकशी केली.
सीबीआयच्या दोन टीमने त्यांची आळीपाळीने चौकशी केली. प्रश्नोत्तरांची रेकाॅर्डिंगही केली. दुसरीकडे या घटनाक्रमावरून दिवसभर राजकारण होत राहिले. सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले, सिसोदियांना गुजरातमध्ये प्रचारापासून रोखण्यासाठीच चौकशीला बोलावले आहे. त्यांना गुजरातचे निकाल येईपर्यंत तुरुंगात ठेवले जाईल.
अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यावरून सीबीआय मुख्यालयात दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या चौकशीदरम्यान तपास यंत्रणा सिसोदियांच्या उत्तरांनी समाधानी झाली नाही. सूत्रांनी सांगितले की, सिसोदियांना ३० प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी बहुतांश प्रश्नांच्या उत्तरात सिसोदिया म्हणाले, मलाही काहीच माहीत नाही.
रात्री ९ वाजता सीबीआय मुख्यालयातून निघाल्यानंतर सिसोदिया यांनी सीबीआय वर आरोप केला की, ‘तुमचा पक्ष सोडून द्या, केस बंद होईल व तुम्हाला मुख्यमंत्री केले जाईल’ अशी ऑफर सीबीआयने मला दिली. सीबीआयने हे आरोप नंतर फेटाळले.
सिसोदिया सीबीआय मुख्यालयातून बाहेर आल्याच्या काही वेळानंतर केजरीवाल म्हणाले, सिसोदिया मंगळवारी प्रचारासाठी गुजरातला जातील.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे