नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वीच्या द्वितीय टर्मच्या परीक्षा 26 एप्रिलपासून होणार आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे डेटशीट नंतर येईल. विशेष म्हणजे परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं होणार आहेत.
कोरोनामुळं CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. CBSE इयत्ता 10वी टर्म-1 बोर्ड परीक्षा किरकोळ विषयांसाठी 17 नोव्हेंबर आणि प्रमुख विषयांसाठी 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली. त्याच वेळी, 12वी वर्गाच्या लहान विषयांच्या परीक्षा 16 नोव्हेंबर आणि प्रमुख विषयांच्या परीक्षा 01 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आल्या.
अजून आलेला नाही टर्म 1 चा निकाल
CBSE ने अद्याप 10वी 12वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. असं सांगण्यात येत आहे की सीबीएसई लवकरच टर्म 1 बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर करू शकते. टर्म 1 बोर्ड परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या परीक्षा रोल नंबरच्या मदतीनं त्यांचे निकाल तपासण्यास सक्षम असतील. बोर्डाच्या cbseresults.nic.in आणि results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर मार्कशीटच्या स्वरूपात निकाल जाहीर केले जातील.
टर्म 1 चा निकाल कसा पाहू शकता
बोर्डाने अद्याप निकालाची तारीख अधिकृतपणं जाहीर केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार होते, त्यामुळे आता कधीही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे लागंल. अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, CBSE बोर्ड परीक्षेचे निकाल UMANG अॅप, IVRS, SMS आणि Digilocker प्लॅटफॉर्म digilocker.gov.in वर देखील उपलब्ध असतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे