गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापरण्याबरोबरच लसीकरणावर भर द्यावा : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया
पुणे, ता. २२ डिसेंबर २०२२ : चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला.
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ”कोरोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली, तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा,” असे मंडाविया यांनी सांगितले.
आपण सतर्कच आहोत
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, की भारतात सध्या आढळणारे रुग्ण हे ७५ टक्के बीए.२.७५ प्रकारचे, तर उर्वरित बहुतेक रुग्ण हे एक्सबीबी प्रकारचे आहेत. बीएफ.७ चे काही मोजके रुग्ण आपल्याकडे पूर्वी आढळले; मात्र येथील लोकसंख्येला संसर्ग करण्यात त्यांना यश आलेले नाही. जनुकीय क्रमनिर्धारणाची प्रक्रिया आपण करीत आहोतच. भारतातील रुग्णसंख्येत काही फरक दिसल्यास जनुकीय क्रमनिर्धारणाचा वेगही वाढविण्यात येईल, असेही डॉ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.
राज्यात सक्तीबाबत आज निर्णय
केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. करोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नसला तरी निर्बंध लागू करायचे का, मुखपट्टीची पुन्हा सक्ती करायची की नाही, याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. करोना कृती दल पुन्हा स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
दरम्यान, चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनंतर केंद्र सरकारने आजपासून विमानतळांवर रॅंडम कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने दिली आहे. वेळीच सावध पावले उचलण्यास सुरवात केली असून वाढत्या रुग्णससंख्येच्या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.
तसेच भारतातील सध्याच्या स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी होणार नाही. कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रुग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करण्याचे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील