नवी दिल्ली, २८ जुलै २०२१: कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं तोमर यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात पावसानं थैमान घातलंय. याकाळात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अशावेळी केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी ७०० कोटींची मदत जाहीर केलीय.
महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी ७०० कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे