मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मितीस केंद्र सरकारची परवानगी

मुंबई, १६ एप्रिल २०२१: कोरोना लशीच्या निर्मितीसाठी मुंबईतील हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन एकत्र येत मुंबईत कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. भारतामध्ये सध्या भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ इंडिया मेडिकल रिसर्चमार्फत कोवॅक्सिन लस निर्मिती केली जाते. याबाबत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.


मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार


हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.


हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला स्वतंत्रपणे कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोरोना लसी निर्मितीसाठी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्लांटवर गरज असेल तोपर्यंत कोरोना लस निर्मिती केली जाईल, त्यानंतर हा प्लांट श्वान दंशावरील लस निर्मितीसाठी वापरला जाईल, किंवा वेळोवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठीही या प्लांटचा वापर होईल.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हाफकिनला भेट


२० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले. “मी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय मांडला आहे. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे. तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता आहे”, असं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा