बीड, २५ सप्टेंबर २०२३ : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. यावेळी जीएसटी विभागाने काही कागदपत्रे जप्त केली होती. ही कागदपत्र तपासली होती. यावेळी या कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यापूर्वीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडून त्यावर काय उत्तर दिले जाते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, या आधीच युनियन बँकेने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर बाराशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालयाने नोटीस बजावल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर










































