मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ : मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी तीन वेगवेगळ्या कारणांमुळे रखडली. याचा फटका कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सोलापूरहून मुंबईला येणाऱ्या १२११६ एक्स्प्रेस मध्ये आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात चेन पुलिंग झाले.
त्यामुळे गाडी जागीच खोळंबली. या एक्सप्रेसच्या मागे असणाऱ्या जलद लोकल आणि काही एक्स्प्रेस रखडल्या. या गोंधळामुळे कामावर जायला उशिर झाल्याने गाड्यांना गर्दी झाली. त्यातच रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी जलद मार्गांवरील गाड्या धिम्या मार्गावरुन वळविल्या. गाड्यांना गर्दी झाल्यामुळे गाडीत चढता येत नव्हते. यामुळे संतप्त झालेली एक महिला दिवा स्थानकात अप खोपोली लोकलच्या मोटरमनच्या केबिन मध्ये गेली.
ही महिला खाली उतरण्यास तयार नसल्याने मोटरमनने काही वेळ लोकल थांबवली त्यामुळे वेळापत्रकचे तीन तेरा वाजले. यामुळे दिवा स्थानकात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भांडुप ते नाहूर दरम्यान अप जलद मार्गांवर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सकाळपासून मध्य रेल्वेची सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर