पुणे, ८ जानेवारी २०२३ : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट संघाची नवीन निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (ता. सात) पाच सदस्यीय पुरुष वरिष्ठ निवड समितीची नावे जाहीर केली. चार सदस्य पूर्णपणे नवीन आहेत; परंतु निवड समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा चेतन शर्मा यांची वर्णी लागली आहे, ‘बीसीसीआय’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे नवीन निवड समिती सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मागील निवड समितीच्या कार्यकाळात भारताला ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर ‘बीसीसीआय’ने नवीन निवड समिती स्थापन करण्याची घोषणा केली. आता पुन्हा एकदा निवड समितीची धुरा चेतन शर्मा यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने निवड समिती सदस्यांसाठी सहाशेहून अधिक अर्जांपैकी ११ जणांची निवड केली होती. नंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अखेर ११ पैकी ५ जणांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. चेतन शर्मा यांची अध्यक्षपदी, तर माजी कसोटीपटू सलील अंकोला, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ‘बीसीसीआय’ने नवीन निवड समिती नेमण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत यावेळी पूर्णपणे नवे चेहरे पाहायला मिळतील, असे मानले जात होते. तथापि, निवड प्रकियेसाठी यामध्ये बराच वेळ घेतला आणि या काळात केवळ जुनी समिती टीम इंडियाची निवड करीत होती. १ जानेवारी २०२३ रोजी ‘बीसीसीआय’ने टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि २०२३ च्या विश्वकरंडकासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी बैठक घेतली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील