चंबा बोगद्याच्या यशस्वी कार्यक्रमाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, दि. २६ मे २०२०: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज चारधाम परियोजनेअंतर्गत चंबा बोगद्याच्या यशस्वी कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्स मोडच्या माध्यमातून उदघाटन केले. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ऋषिकेश -धारासू रस्ते महामार्गावरील (एनएच९४ ) वरील व्यस्त चंबा शहराच्या खाली ४४० मीटर लांबीचा  बोगदा खणून हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. कोविड -१९ आणि देशव्यापी लॉकडाऊनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा पहिलाच प्रकल्प पूर्ण झाला. भुसभुशीत मातीचा थर, सतत झिरपणारे पाणी , वरच्या बाजूस अवजड बांधकाम क्षेत्र त्यामुळे घरे कोसळण्याची शक्यता, भूसंपादनाची समस्या, कोविड लॉकडाऊन दरम्यान निर्बंध इत्यादी बाबीं लक्षात घेता बोगद्याचे बांधकाम एक आव्हानात्मक काम होते.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, उत्तराखंडमधील या ऋषिकेश-धारसू-गंगोत्री रस्त्याची सामाजिक आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते म्हणाले, हा बोगदा खुला झाल्यामुळे चंबा शहरातून होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि अंतर एक किलोमीटरने  कमी होईल तसेच पूर्वीच्या  तीस मिनिटांच्या तुलनेत दहा मिनिटे लागतील. अत्यंत कठीण भागात काम केल्याबद्दल आणि महत्वपूर्ण  प्रकल्पांची अंमलबजावणी सुनिश्चित केल्याबद्दल गडकरी यांनी सीमा रस्ते संघटनेचे  कौतुक केले. ते म्हणाले की २०२० च्या ऑक्टोबरपर्यंत म्हणजे निर्धारित मुदतीच्या तीन महिने आधी हा  प्रकल्प पूर्ण होईल असे त्यांना सांगण्यात आले आहे .

सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपालसिंग म्हणाले, सीमा रस्ते संघटनेने जानेवारी २०१९ मध्ये या बोगद्याच्या उत्तर पोर्टलवर काम सुरू केले परंतु  सुरक्षा आणि भरपाई या मुद्द्यांवरून स्थानिकांच्या कडक प्रतिकारांमुळे दक्षिण पोर्टलवर ऑक्टोबर २०२९ नंतरच काम सुरू केले जाऊ शकते. वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच  दिवसा आणि रात्रीच्या कामाच्या पाळ्यांमुळे हे काम यशस्वीरित्या झाले.  प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पातील बीआरओ हा प्रमुख हितधारक असून या बोगद्याचे काम टीम शिवालिकने पूर्ण केले आहे. अत्याधुनिक ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्या बांधकामात केला आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी यावर्षी ऑक्टोबरपर्यंत नियोजित तारखेच्या जवळपास तीन महिने आधी खुला होईल.

प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पांतर्गत सुमारे ८८९ किलोमीटर लांबीच्या अंदाजे १२,०००  कोटी रुपये खर्चाच्या  प्रकल्पासाठी पवित्र गंगोत्री आणि बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा २५०  कि.मी. राष्ट्रीय महामार्ग बीआरओ बांधत आहे.  बहुतेक कामे निर्धारित वेळेपूर्वी प्रगतीपथावर आहेत आणि बीआरओ यावर्षी ऑक्टोबरपर्यंत चार प्रकल्प पूर्ण करणार आहेत.

बीआरओला ऋषिकेश – धारासू (एनएच-९४) रस्त्यावरील १७ प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली असून  २५१ कि.मी. लांबीच्या सुमारे ३,०००  कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचा यात समावेश आहे. धारासू-गंगोत्री महामार्गावर (एनएच -१०८) ११० कि.मी. लांबीचा आणि जोशीमठ ते माना (एनएच -५८) लांबी ४२ किलोमीटर आहे. यापैकी १५१ किलोमीटर लांबीचे १० प्रकल्प मंजूर झाले आहेत ज्याची किंमत १७०२  कोटी रुपये असून खालीलप्रमाणे काम प्रगतीपथावर आहे: –

•  ऋषिकेश – धारासू (एनएच–९४), 99 कि.मी. लांबी (पाच प्रकल्प)

•  धारासू- गंगोत्री महामार्ग (एनएच -१०८), ३२ कि.मी. लांबी (दोन प्रकल्प) बीईएसझेडचे पाच प्रकल्प अद्याप मंजूर झालेले नाहीत.

•  जोशीमठ ते माना (एनएच-५८)) K२ किमी (तीन प्रकल्प) . दोन प्रकल्पांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही

बीआरओ १० प्रकल्पांपैकी ५३ कि.मी. लांबीचे एकूण चार प्रकल्पनिर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करणार आहे त्याच्या तारखा पुढीलप्रमाणे –

• धारासू- गंगोत्री महामार्ग  (एनएच -१०८)११०-१२३ किमी – जून २०२० पर्यंत .

• ऋषिकेश- धारासु महामार्ग (एनएच -९४)  २८-५९ किमी -.जुलै २०२० पर्यंत

• चंबा बोगद्यासह ऋषिकेश- धारसू महामार्ग (एनएच-९४) किमी ५९-६५-ऑक्टोबर २०२०  पर्यंत.

• ऋषिकेश- धारासु महामार्ग (एनएच -९४) वर चिनियलिसौर बाय पास-ऑक्टोबर २०२० पर्यंत.

या १० प्रकल्पांपैकी व्यस्त चंबा शहराची कोंडी दूर करण्यासाठी ४४० मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. हा हॉर्स शू प्रकारचा बोगदा असून १० मीटर  कॅरेज वे रुंदी आणि ५.५ मीटर उंची आहे. या बोगद्याचा मंजूर खर्च १०७.०७ कोटी रुपये आहे. बोगद्यासाठी ४३ कोटी आणि बोगद्याकडे जाण्याऱ्या ४.२  कि.मी. मार्गांकरिता  ४३ कोटी रुपये खर्चासह  ८६ कोटी रुपये खर्चसाठी देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा