जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता,पुणे हवामान विभागाचे संचालक के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला अंदाज

पुणे,४ जुलै २०२३ : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिराने झाले. दरवर्षी ७ जूनपर्यंत मान्सून सुरू होऊन राज्यभरात पोहचतो. परंतु यंदा बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने मान्सूनचे आगमन लांबले. हवामान विभागाने राज्यात २५ जून रोजी मान्सून पोहचल्याची घोषणा केली. पुणे, मुंबईसह कोकणात पाऊस सुरु झाला. जून महिन्याच्या शेवटचा आठवडा या ठिकाणी चांगला पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही पाऊस पडला. परंतु राज्यातील अजून अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. पुणे हवामान विभागाने ही माहिती दिली. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

पुणे हवामान विभागाचे संचालक के.एस.होसळीकर यांनी राज्यातील पावसासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रमधील काही भागात पाऊस झाला आहे. इतर भागात अजून चांगला पाऊस झालेला नाही. राज्याला अजूनही मोठ्या पावसांची गरज आहे. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी ७ जूनपर्यंत राज्यात पावसाचे आगमन होते. त्याला आता जवळपास महिना होत आला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. विदर्भातील अनेक भागांत अजूनही पाऊस नाही.देशभरात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. देशात सर्वत्र दरवर्षी ७ जुलै रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २ जुलै रोजी आला आहे. देशात सहा दिवस आधी मान्सून आला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह २० राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा ८% कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा