राज्यातील काही भागांत आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता : हवामान विभागाचा अंदाज

पुणे, ७ मार्च २०२३ : आज राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे‌. दरम्यान, पुढील ३ ते ४ तासांत मुंबई, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भ भागांवर मंगळपर्यंत वादळी पावसाचे संकट आहे. ७ मार्च रोजी मराठवाडा; तसेच विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. सुरवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रातपुरत्या मर्यादित असलेल्या अवकाळीच्या संकटाने आता निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. अवकाळीचे वातावरण ८ मार्चनंतर निवळेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

कांदा, गहू, हरभरा, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा; तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बागायतदारांचे नुकसान झाले असून, बुलडाण्यातील गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. पालेभाज्यांना बाजारात भाव नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात आता अस्मानी संकटाची भर पडली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा